Skip directly to content

Goshtarang Fellowship 2019-20 (Marathi)

गोष्टरंग पाठ्यवृत्ती (फेलोशिप) २०१९-२०२०

तुम्हाला लहान मुलांसाठी नाटक करण्यात रस वाटतो का?

तुम्हाला रंगभूमीचाअनुभव आहे का?

तुम्हाला बालसाहित्यात रस वाटतो का?

ग्रामीण भागात काही महिने कामाचा अनुभव घ्यायला तुम्हाला आवडेल का?

तुम्ही २० ते ३० वयोगटातले आहात का?

क्वेस्ट संस्थेच्या गोष्टरंग फेलोशिपबद्दलची ही माहिती वाचा

आणि इंटरेस्टिंग वाटल्यास लवकर अप्लाय करा.

 

‘गोष्टरंग’ विषयी   

‘गोष्टरंग’ हा क्वेस्ट या सामाजिक संस्थेच्या वाचनलेखन समृद्धी कार्यक्रमातील एक अभिनव उपक्रम आहे.ग्रामीण आणि आदिवासी विभागात वाचन संस्कृती अजूनही म्हणावी तशी रुजलेली नाही. अशा भागातल्या मुलांसाठी बालसाहित्यातल्या किंवा मुलांच्या पुस्तकांतल्या गोष्टी सादर केल्या, तर त्यांना वाचन–लेखनाची ओढ वाटू शकेल या अपेक्षेने क्वेस्टने २०१६ मध्ये ‘गोष्टरंग’ हा कार्यक्रम सुरू केला.

‘गोष्टरंग’ म्हणजे बालसाहित्याचे सादरीकरण. गेल्या वर्षात महाराष्ट्रातल्या २५ जिल्ह्यातल्या आश्रम शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गोष्टरंगचे १००हून जास्त प्रयोग झाले आहेत. मुलांना आणि शिक्षकांनाही हे प्रयोग फारच आवडतात. केवळ गोष्टींचं सादरीकरण न करता त्या गोष्टीच्या पुस्तकांवर आधारित खेळ आणि कृतीही मुलांसोबत  घेतल्या जातात. त्यामुळे मुलांना पुस्तकं आवडू लागली आहेत आणि ती पुस्तकांची मागणीही करू लागली आहेत. शिक्षक सांगतात की, आता मुलं आपणहून बोलू लागली आहेत, आपले विचार मांडू लागली आहेत आणि त्यांचं लेखनही सुधारलं आहे!

 

 

गोष्टरंग पाठ्यवृत्ती (फेलोशिप) २०१९-२०

गोष्टरंग फेलोशिप ही नाट्य प्रशिक्षण घेतलेल्या किंवा रंगभूमीचा अनुभव असलेल्या तरुण व्यक्तींसाठी आहे. या फेलोशिपद्वारे बालरंगभूमीच्या क्षेत्रात काम करण्याचा सकस अनुभव मिळेल. गोष्टी सांगणं, पुस्तक वाचणं, नाटक पाहाणं अशा सांस्कृतिक घटना जिथे अभावानेच घडतात अशा ग्रामीण आणि आदिवासी विभागात काम करायची संधी मिळेल. नाट्यक्षेत्रातल्या कारकीर्दीसाठी हा एक समृद्ध करणारा अनुभव ठरेल.

दहा महिन्यांच्या या फेलोशिपसाठी आम्ही ५ जणांची निवड करणार आहोत. त्यांना एका निवासी कार्यशाळेत दोन प्रकारचं प्रशिक्षण दिलं जाईल.

 1. गोष्टींचं सादरीकरण करण्यासाठी नाट्यप्रशिक्षण  
 2. बालसाहित्याचा वापर वर्गात प्रभावीपणे करण्यासाठी Active Libraryउपक्रमांचं प्रशिक्षण  

आत्तापर्यंतच्या उपक्रमात चिन्मय केळकर, विद्यानिधी वनारसे आणि गीतांजली कुलकर्णी यांसारखे प्रसिद्ध रंगकर्मी आणि नीलेश निमकर हे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ गोष्टरंगचे प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत.

प्रशिक्षणानंतर या फेलोजनी शाळांमधून प्रयोग करावेत आणि त्यासाठी लागणारी तयारी, आयोजन हे सर्व सांभाळावं अशी अपेक्षा आहे. फेलोशिपच्या कालावधीत दर महिन्याला स्टायपेंड दिला जाईल, ज्यातून किमान राहण्या-जेवण्याचा खर्च निघू शकेल आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची काळजी न करता फेलोज कार्यक्रमावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतील.

ही फेलोशिप कोणासाठी?

२०-३० वयोगटातल्या उत्साही तरुण-तरुणींसाठी

दहा महिन्यांच्या पूर्णवेळ फेलोशिपसाठी वेळ देऊ शकणाऱ्यांसाठी

नाट्य / रंगभूमी या विषयाची पदवी / पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेल्यांसाठी, किंवा तशा प्रकारचा अनुभव असणाऱ्यांसाठी

निवडलेल्या फेलोजकडून आमच्या मुख्य अपेक्षा

मराठी बोलता येणं अनिवार्य

शारीरिक सुदृढता अतिशय आवश्यक

ग्रामीण भागात अगदी साधारण सोयी-सुविधांसह राहण्याची तयारी

ग्रामीण आणि आदिवासी भागांत उपलब्ध परिस्थितीत आणि कमीत कमी सोयी-सुविधांसह गोष्टी सादर करण्याची तयारी

कम्प्युटर वापरता येत असेल तर अधिक उपयुक्त होईल

कामाचं ठिकाण

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागात, आश्रम शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांत मुख्यतः काम करावं लागेल. काही प्रयोग शहरी / निमशहरी भागांत असू शकतील.

फेलोशिपचा कालावधी

१० महिने, पूर्ण वेळ (१५ जून २०१९ ते १५ एप्रिल २०२०)

पाठ्यवृत्ती / स्टायपेंड

दरमहा रु. १८,०००/- (निवड झाल्यानंतर काही कारणास्तव ही फेलोशिप अर्ध्यातच सोडावी लागली तर तोपर्यंत मिळालेली रक्कम संस्थेला परत करावी लागेल)

निवड झालेल्या फेलोजना खालील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील

 • निवासी कार्यशाळेत पूर्ण वेळ सहभाग
 • गोष्टींची निवड आणि सादरीकरण यासाठी नव्या कल्पना सुचवणं, त्या कार्यान्वित करायला मदत करणं
 • बालसाहित्याचा प्रभावी वापर करण्यासाठी ‘Active Library’च्या कृती शिकून त्या वर्गात मुलांसोबत करणं
 • क्वेस्ट टीमच्या सहयोगाने शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करणं आणि ते व्यवस्थित पार पाडणं
 • छोट्या मुलांसाठी २-३ दिवसांच्या ‘नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा’मध्ये शिकवणं आणि मदत करणं
 • ग्रामीण भागात अगदी साधारण सोयी-सुविधांसह राहणं 
 • ग्रामीण आणि आदिवासी भागांत उपलब्ध परिस्थितीत आणि कमीत कमी सोयी-सुविधांसह गोष्टी सादर करणं
 • फेलोशिप कालावधीतले शिकण्याचे अनुभव आणि प्रत्यक्ष प्रयोगांचे अनुभव सतत नमूद करणं
 • मासिक अहवाल लिहिणं

निवास व्यवस्था

राहण्याची जागेची व्यवस्था आणि कार्यक्रमासाठी होणारा प्रवासखर्च संस्थेतर्फे केला जाईल.

निवड प्रक्रिया

अर्जदारांसोबत अर्ध्या दिवसाची कार्यशाळा आणि वैयक्तिक मुलाखत

महत्त्वाच्या तारखा

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – २५ एप्रिल २०१९

मुलाखतीसाठी निवडलेल्यांना १० मे पर्यंत कळवण्यात येईल

अर्ध्या दिवसाची कार्यशाळा आणि मुलाखत २० मे - ३० मे  दरम्यान होईल (याचं ठिकाण नंतर कळवण्यात येईल)

फेलोशिपसाठी ५ जणांची निवड १जूनला जाहीर होईल

फेलोशिप आणि निवासी कार्यशाळेची सुरुवात – १५ जून २०१९

या फेलोशिपसाठी अर्ज गूगल फॉर्म स्वरूपात आहे, तो खाली दिलेल्या लिंकवर जाऊन भरावा.

https://forms.gle/2htoFBnDkEAdjXeG9

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : २५ एप्रिल, २०१९