तिळसे येथे “मासे वाचवा अभियान”
दिनांक 2 मार्च रोजी 'शिक्षक अभ्यास मंडळ 'आणि 'क्वेस्ट' याच्या वतीने महाशिवरात्री निमित्त 'मासे वाचवा अभियान' करण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम करण्यात येतो. तिळसे येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीच्या जत्रेनिमित्त वाडा पूर्व भागातून तसेच मुंबई पासून लोकांची गर्दी होत असते. एक तर हे जागृत देवस्थान आहे ही लोकांची श्रद्धा आहे. तसेच इथल्या कुंडातील माशांची कीर्ती दूरवर पसरली आहे, म्हणून येवढी गर्दी होत असावी. या वर्षी जवळ-जवळ 80,000 च्या आसपास लोक आले होते.
तीन वर्षापूर्वी एका अभ्यासगटात या माशांविषयी एका शिक्षकाने सांगितले, की आदल्या वर्षी येथील मासेकुंडातील 300 मासे जत्रेनंतरमेले होते. त्याची कारणमीमांसा करताना असे लक्षात आले की हे मासे महाशिवरात्रीत लोकांनी केलेला कचरा आणि तेथील माशांना खायला कुंडात टाकलेले अन्न यामुळे मेले असावेत. लोकांनी टाकलेला खाऊ तेलकट असल्यामुळे कुंडातील माशांचा बाहेरच्या ऑक्सिजनशी संबंध तुटला आणि माशांना आपला जीव गमवावा लागला. म्हणून अशी कल्पना पुढे आली की आपण हे मासे वाचवले पाहिजेत.
अभ्यासगटामार्फत या माशांची माहिती गोळा करताना एक महत्वाची माहिती मिळाली ती म्हणजे, हे मासे 'महाशीर' जातीचे असून ही जात संपूर्ण आशिया खंडात फक्त दोनच ठिकाणी आढळते, आणि त्यातले एक ठिकाण म्हणजे तिळसा!
पहिल्या वर्षी केलेल्या अभियानाला लोकांचा प्रतिसाद कमी मिळाला. पण आता सलग तिसर्या वर्षी मात्र लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे. यावेळेस माशांची माहिती देणारी रेकॉर्डिंग वापरून ध्वनिक्षेपकावरून सतत सूचना दिल्या जात होत्या आणि आवाहनाचे नवे बोर्ड ठिकठिकाणी लावले.
त्यामुळे कचरा आणि खाद्यपदार्थांचं प्रमाण खूप कमी आढळले. तसेच लोक स्वतःहून एकमेकांना सांगत होते, की कुंडात कचरा टाकू नका! क्वेस्टचे बालमित्र, पर्यवेक्षक आणि अभ्यासगटातले शिक्षक यांच्या परिश्रमांचा परिणाम अशा प्रकारे हळूहळू दिसून येतो आहे!




