विज्ञान खेळणी कार्यशाळा
दिनांक 28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून दिनांक 27 फेब्रुवारी, 2011 रोजी क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट अणि शिक्षक अभ्यास मंडळ यांच्या एकत्रित प्रयत्नाने वाडा तालुक्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक खेळणी बनवण्याची कार्यशाळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा येथे आयोजित केली होती. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता, की मुलांना विज्ञान शिक्षण अधिक मनोरंजक आहे याची जाणीव व्हावी, आणि खेळण्यांच्या स्वरूपात विज्ञान शिकून त्यांचा आनंद घेता यावा.

ही कार्यशाळा विद्यार्थांसाठी विनामूल्य होती. या कार्यशाळेला विद्यार्थांचा व पालकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विज्ञान कार्यशाळेचा आनंद 77 मुलांनी प्रत्येकी तीन विज्ञान खेळणी बनवून घेतला. या दरम्यान पालकांना क्वेस्ट संस्थेतर्फे दर्जेदार शिक्षणासाठी चालणार्या शैक्षणिक उपक्रमांची ओळख करून देण्यात आली. अशा प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम नेहमी करण्यासाठी पालकांनी विनंती केली. विद्यार्थांनीही आणखी अशीच मनोरंजक विज्ञान खेळणी शिकण्यासाठी उत्सुकता दाखवली.
या कार्यक्रमासाठी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर वाडा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कदम मॅडम व त्यांचे सहकारी या सर्वांचे सहकार्य लाभले, त्यांचे विषेश आभार. आणि शिक्षक अभ्यास मंडळाच्या सभासदांनी अतिशय उत्साहाने काम करून हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!




